पुणे - दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर 23 मार्च रोजी रद्द करण्यात आला होता. दहावीच्या विद्यार्थ्यांना इतर विषयांत मिळणारे सरासरी गुण लक्षात घेऊन त्यांना भूगोल (सामाजिक शास्त्रे पेपर - २) या विषयाला गुण देण्यात येणार आहेत. हा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. शिक्षण मंडळाच्या निर्णयामुळे दहावीचा निकाल लवकर जाहीर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याचसोबत दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील कार्यशिक्षण विषयाचे गुण सरासरीनुसार देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 23 मार्चला घेण्यात येणारा दहावीचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा पेपर सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यी या परीक्षेला बसले होते. रद्द करण्यात आलेल्या पेपरचे गुणांकन करण्याबाबत संभ्रम होता. यासंदर्भात शालेय शिक्षण आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. मागील दोन आठड्यांपासून राज्य शिक्षण मंडळाने भूगोलच्या पेपरला गुण देण्यासंदर्भातील विविध पर्यायांचा अहवाल मंत्रालयात पाठवला होता. परंतु त्यावर मंगळवारी उशिरा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
त्याच पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या भूगोलाच्या पेपरला गुण देण्यासंदर्भात निर्णय घेतला. दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये मिळणाऱया गुणांची सरासरी लक्षात घेऊनच भूगोलच्या पेपरला गुण दिले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर इतर कोणताही शेरा नसेल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांना मात्र स्वतंत्र सवलत देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना भूगोलचे गुण देताना त्यांची मागे घेण्यात आली तोंडी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षेच्या गुणांची सरासरी विचारात घेतली जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना भूगोलाच्या गुणांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.