पुणे - राज्यात सध्या औरंगाबाद शहाराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यावरून राजकारण तापू लागले आहे. यास काँग्रेससह अन्य काही पक्ष आणि संघटनांकडून विरोध होत आहे. मात्र, हा वाद सुरू असतानाचा आणखी एक नामांतराची मागणी पुढे आली आहे. ती म्हणजे राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी होय. राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराख झालेल्या पुण्याला वसवले आहे. त्या पुण्याला जिजाऊंचं नाव देऊन पुण्याचे 'जिजापूर' असं नामांतर करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
तसेच औरंगाबादचं संभाजीनगर करा ही राजकीय मागणी असल्याचे सांगत, संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यात आहे. त्यांचा अंत्यविधी आणि दफन पुण्यात झाले. मग पुण्याला त्यांचे नाव दिले पाहिजे, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी देखील पुणे शहर व जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करायला हवे अशी मागणी केली होती.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. पुण्यात राष्ट्रमाता जिजाऊंनी 'बाल शिवबा'ला घेऊन सोन्याचा नांगर चालवून पुणे वसवले, त्या पुण्याचं आज सोनं झालेले आहे," असेही संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. एकीकडे औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी जोर धरत असतानाचा पुणे या ऐतिहासिक शहराचे नाव जिजापूर करण्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर वसविण्यामागे जिजाऊंचे कशा प्रकारे योगदान आहे.. याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष वृत्तांत....
माँ साहेब जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी -
ऐतिहासिक शहर म्हणून पुणे ओळखले जाते. या शहराला मोठा प्राचीन इतिहास आहे. सद्यस्थितीत आजही पुण्यात विविध गावे आणि पेठांचा समूह आहे. शहरातील कुंभारवाड्यात पुणे पुरातन देवस्थान आहे. या देवस्थानाच्या नावावरूनच पुणे असं नाव ठेवण्यात आल्याची आख्यायिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माँ साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच पुणे. पुण्याची अनेक नावे इतिहासात आढळतात. जसे की पुण्यनगरी, पुनवडी, पुनावाडी या नावांचा उल्लेख इतिहासात आहे.
शिवाजी महाराजांना पुण्याला घेऊन आल्या जिजाऊ-
छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली होती. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली होती. कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी महाराज पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईनी नुसत्या देवाधर्माच्या गोष्टी सांगितल्या नाहीत, तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले होते, ते याच पुण्यात...
जिजाऊंनी बाल शिवबा'ला घेऊन सोन्याचा नांगर चालवून वसवले पुणे-
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत. फक्त एवढ्यावर त्या थांबल्या नाहीत. ज्या कसब्यात आदिलशहाने गाढवाचा नांगर फिरवला होता तिथे बाळ शिवबाच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला. ही अभूतपूर्व अशी घटना होती. कोणत्याही अंधश्रद्धेला न जुमानता त्यातून जनतेच्या भल्यासाठी मार्ग काढणे ही मोठी शिकवण जिजाऊंनी शिवबांना दिली होती, इतकेच नाही कोल्हे, लांडगे यासारख्या उपद्रवी जंगली जनावरांच्या बंदोबस्तासाठी इनाम देण्याचे फर्मान त्यांनी काढलं. प्रजेची या कृतीमुळे भीती मोडली. लोक गावात परतून आली. शेतं पुन्हा पिकांनी डोलू लागली अन् पुणे शहर पुन्हा जुन्या वैभवान सजू लागले.
पुण्यात पाहिले कार्य गणेशमूर्तीच्या स्थापनेच-
जिजाऊंनी पुण्याचा कारभार हाती घेतला आणि सगळ बदलायचे ठरवले. गाव नव्याने वसवायचे ठरवले. मदतीला फडावरचा कारभार बघायला म्हणून सिंहगडचे किल्लेदार दादोजी कोंडदेव यांची नेमणूक शहाजी महाराजांनी केली होती. त्यांनी झांबरे पाटलांची जागा विकत घेऊन तिथे आऊसाहेब आणि महाराजांच्या वास्तव्यासाठी लाल महाल बांधला. पुणे पुन्हा वसत होते. अशातच जिजाऊंनी पुण्यात पाहिले कार्य काय केले असेल तर, ते म्हणजे गणरायाची मूर्ती बसवली आणि ही मूर्ती म्हणजे आजचा कसबा गणपती होय.
जिजाऊंचे आणि शिवरायांचे उपकार पुणेकर कधीच विसरणार नाहीत-
खऱ्याअर्थाने पुण्यात स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली गेली आणि म्हणूनच जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी पुण्यावर केलेले अनंत उपकार पुणेकर कधीच विसरणार नाही, अशी भावना यावेळी इतिहास अभ्यासक मोहन शेट्टे यांनी व्यक्त केल्या.