पुणे - सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका वाढला आहे. अश्या उन्हाच्या या वातावरणात प्रत्येकजण उन्हापासून सरंक्षण मिळावं यासाठी काही ना काही शक्कल लढवतच असतो. अश्यातच गेल्या 2 वर्षाहुन अधिक काळापासून पुण्यातील पर्यावरण प्रेमी सिकंदर मोमीन हे पर्यावरणाचा संदेश देत आहेत. त्यांनी त्यांच्या रिक्षावर आकर्षक अशी झाडे, तसेच प्रतिकात्मक पक्षी, प्राणी लावले असून याद्वारे मोमीन रिक्षात प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना झाडे लावा झाडे जगवा, जल है तो कल है, पाणी अडवा, पाणी जिरवा असा संदेश देत आहेत.
. . .म्हणून रिक्षालाच बनवलं जंगल - मोमीन यांना लहानपणापासूनच पर्यावरणाची आवड आहे. गेल्या काही वर्षात शहरीकरण वाढल्याने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जंगल नष्ट होत चालले आहेत. प्राणी पक्षी शहरांकडे वाटचाल करू लागले आहेत. अशातच आपण पर्यावरण प्रेमी असल्याने आपण काहीतरी केलं पाहिजे हा प्रश्न सातत्याने मनात येत होता. रिक्षा चालवत असताना उन्हाचा होणारा त्रास त्यानंतर वाढत जाणार ऊन यावर काहीतरी केलं पाहिजे हा प्रश्न नेहेमी येत होता. तेव्हा आपल्या रिक्षाला जंगलाचा स्वरूप देऊन त्याद्वारे पर्यावरणाचा संदेश द्यायची कल्पना सुचल्याचे मोमीन यांनी सांगितलं.
हिरवा मॅट लावून देत आहे पर्यावरणाचा संदेश - लॉकडाऊनच्या आधी मी माझ्या रिक्षामध्ये हिरवळी वेल खरेदी केली आणि रिक्षांमध्ये हिरवळ लावली आहे. त्यात विविध प्रतिकात्मक प्राणी, पक्षी, तसेच विविध रंगी फुले लावून पर्यावरणाचा संदेश देत आहे. तसेच प्रवाश्यांना जंगलात बसल्याचा आनंद मिळवा आणि त्यांना उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी हिरवा मॅट लावल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.
सुरवातीला जास्त भाड्याच्या भीतीने लोक बसत नव्हते - हिरवा मॅट रिक्षाला लावल्यानंतर आणि त्यात प्राणी, पक्षी लावल्याने लोकांना सुरवातीला वाटत होतं की जास्त भाडं घेण्यात येणार आहे. तसं लोक मला विचारत देखील होते. पण मी त्यांना सांगायचो की नाही नॉर्मल भाडं आहे. तेव्हा प्रवाशी रिक्षामध्ये बसायचे आणि त्यांना खूप चांगलं वाटायचं असंही मोमीन यांनी सांगितलं. कधी कधी तर काही प्रवाशी हे रिक्षात बसल्यावर सेल्फी देखील काढायचे, असा अनुभव देखील यावेळी मोमीनने सांगितला.
एकेकाळी सायकलींचं शहर असलेलं पुणे शहर आत्ता रिक्षाचं शहर म्हणून ओळखल जावू लागलं आहे. यातच अशा आगळ्या वेगळ्या आणि खूप सुंदर रिक्षा पुण्यातील रस्त्यांवर जेव्हा फिरत आहे, तेव्हा बघणाऱ्यांच्या आकर्षणाचा विषय बनत आहे.