पुणे :- रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध ( Russia Ukraine Crisis ) आता गंभीर वळणावर येऊन ठेपलं आहे. रशियन फौजा थेट युक्रेनची राजधानी कीवमध्ये धडकल्या आहेत. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी रशियन फौजांनी कीवमध्ये मार्च केलं असून, महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य केलं जात आहे. दुसरीकडे युक्रेनच्या फौजा देखील रशियन फौजांचा प्रतिकार करत आहेत. असं असताना युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणांत भारतीय विद्यार्थी अडकले ( Indian Student Stuck In Ukraine ) असून, युक्रेनमधील लवानो फ्रँककिवस्क येथे शिक्षण घेत असलेल्या कर्नाटक बॉर्डरवरील सूरज भगाजे या विद्यार्थ्यांशी खास बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी..
उद्या 1 हजार भारतीय परत येणार
युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं असून, आज युद्धाच दुसरा दिवस आहे. युद्धाची परिस्थिती असली तरी युक्रेनमधील लवानो फ्रँककिवस्क या शहरात अजूनही भीतीदायक परिस्थिती नाही. तेथील रस्त्यांवर नागरिकांची ये जा सुरू आहे. भारतीय दूतावासाशी भारतीय विद्यार्थी हे संपर्कात असून, आम्हला वेळोवेळी माहिती दिली जात आहे. उद्या आम्हाला येथून 250 किलोमीटर लांब हंगेरी येथे बसने घेऊन जाणार आहेत. त्यानंतर आम्ही भारतात परत येणार आहे, असं यावेळी सुरज याने सांगितलं आहे.
सुरवातीला भीती वाटत होती
ज्यावेळेला युद्ध सुरू झालं तेव्हा खूप भीती वाटत होती.अनेक प्रश्न निर्माण होत होते. घरच्यांना देखील काळजी लागली होती. सातत्याने भारतात परत या म्हणून सांगत होते. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली तेव्हा आम्ही एक महिना पुरेल एवढं अन्न धान्य गोळा करून ठेवलं होतं, असं देखील यावेळी सूरज याने सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
आमच्या येथून हंगेरी बॉर्डर जवळ असून, तिथं आम्ही उद्या निघणार आहे. 250 किलोमीटर बसने जाणार असल्याने मनात भीती तर खूप आहे. पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी संवाद साधला आहे. ते म्हणाले आहेत की, जोपर्यंत भारतीय विद्यार्थी परत जात नाही तो पर्यंत हल्ले करू नका असं सांगितलं आहे. त्यामुळे खूप धीर वाटत आहे, असं देखील यावेळी सूरज याने म्हटलं आहे.