पुणे - ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे आज सकाळी 9.15 वाजता निधन झालं ( Anil Avchat Passed Away ) आहे. ते 78 वर्षाचे होते. त्याच्यांवर वैकुंठ स्मशानभूमीत अडीच वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी मुक्ता आणि यशोदा अन्य कुटुंबीय असा मोठा परिवार आहे.
अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला होता. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतलेला. अनिल अवचट यांनी १९६९ मध्ये आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनिल अवचटांच्या लिखाणा प्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
अनिल अवचट हे स्वतः पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे.