पुणे - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याच रविवारी संध्याकाळी सांगितलं जातं होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, कार्य, कर्तुत्व सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. बाबासाहेबांनी शिवचरित्रातून शिवराय महाराष्ट्रातच नव्हे तर, देश-विदेशात पोहोचवले.
छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने
बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातील इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
महाराष्ट्र भूषण , पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन आणि जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना २०१५ साली महाराष्ट्र भूषण तर २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'जाणता राजा' या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास
इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहुणे श्री.ग.माजगावकर यांच्याबरोबर ते 'माणूस'मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
'जाणता राजा' या महानाट्याची निर्मिती
पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल, इ.स. १९८४ रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. 'जाणता राजा' मध्ये १५० कलावंत काम करतात आणि याशिवाय हत्ती घोडे यांचाही रंगमंचावर वावर असतो.
हेही वाचा - कंगना रणौत जे बोलली, त्याच्याशी मी सहमत; विक्रम गोखलेंकडून पाठराखण