पुणे - पुण्यातील नवले ब्रिजवर (Navale Bridge Accident) सातत्याने होत असलेले अपघात आणि या अपघातात निष्पाप नागरिकांचा जात असलेले जीव या विरोधात आज (29 डिसेंबर) शिवसेना खडकवासला (Shivsena Khadakwasla) मतदार संघाच्यावतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (Ministry of Road Transport & Highways Office) कार्यालयाबाहेर तिरडी आंदोलन (Tiradi Protest) करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
- अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा -
मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. याला राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जबाबदार आहे. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावर तीव्र उतार आहे. यामुळे वाहने वेगाने जात असतात, परंतु या वाहनांच्या वेगावर कोणतीच मर्यादा न ठेवल्यामुळे सातत्याने अपघातात वाढ होत आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या विषयावर बैठक घेतली होती. यात आठ दिवसात तज्ज्ञ समितीचा अहवाल येणे अपेक्षित होते. परंतु तो अहवाल अजूनही उपलब्ध झाला नसल्याने या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनातील ढिसाळपणा स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख निलेश गिरमे यांनी केली आहे.
- नवले ब्रिजवर आतापर्यंत 100 हून अधिक जणांचा अपघातात मृत्यू-
या नवले ब्रिजवर अपघातामध्ये आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतारावर वेग मर्यादा ८० वरून ४० प्रति तास करण्यात यावी, तसेच त्याचे फलक लावण्यात यावेत, स्टड लाईट बसवावेत, विविध ठिकाणी रम्बल स्ट्रीप, सोलर बिल्कर देखील लावण्यात यावेत, कर्ब पेटिंग करावे, वाहन चालकांना ड्रिंक अॅड डाईव्ह गो स्लोव, अपघात प्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालावा अशा सूचना देणारे फलक लावण्यात यावेत, तसेच महामार्गावर सातत्याने पडणारे खड्डे यावर ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. मंगळवारी देखील या नवले ब्रिजवर अपघात झाला असून, यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने जर या विषयावर गांभीर्याने विचार केला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला.