पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना परिस्थिती चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. सध्या ते मास्तरांच्या भूमिकेत आहेत. कोरोनाबाबत काम करत असताना अजित पवार यांच्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रभाव आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
'...त्यामुळे मंदिरे उघडावी लागली'
विरोधकांनी धार्मिक राजकारण केले, त्यामुळे मंदिरे उघडावी लागली. परंतु आता जे रुग्ण वाढताहेत त्याचे उत्तर ते देणार आहेत का? मुख्यमंत्री दुरदृष्टीचे नेते आहेत. त्यांना संकटाची कल्पना होती, म्हणून त्यांनी हळू हळू एक एक गोष्ट सुरू करण्याची भूमिका घेतली होती, असे ते म्हणाले. राम मंदिर निर्माणाला शिवसेनेमुळे चालना मिळाली. राज ठाकरे अयोध्येला जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. शिवसेनेने त्याठिकाणी केलेले काम त्यांना दिसेल, असे ते म्हणाले.
'चंद्रकांत पाटलांच्या माहितीमुळे ज्ञानात भर पडली'
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करणे हा अटल बिहारी वाजपेयींचा मास्टरस्ट्रोक होता. मोदी तेव्हा राष्ट्रीय राजकारणातही नव्हते. काही लोक प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेतात आणि त्याचा विनोद होतो. त्यांच्या माहितीमुळे ज्ञानात भर पडली, असे ते म्हणाले.
'महापालिका निवडणुका एकत्र लढवू'
आगामी महापालिका निवडणुकांवर बोलताना, पुण्यात बैठका सुरू आहेत. निवडणुकांचे सूत्र ठरलेले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र राहतीलच. काँग्रेसला घेता येईल का, हे बघू, असे ते म्हणाले. पुण्यात राष्ट्रवादी मोठा पक्ष असेल. देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीबाबत विचारले असता, त्यांच्याशी संवाद आहेच. मुलाखत होणारच. मुलाखतीआधी पेपर फुटणार नाही. थेट रिझल्टच बघायला मिळेल, असे ते म्हणाले.