पुणे - सध्या देशात राज्यसभा निवडणुकीचे वारे सुरु आहे. महाराष्ट्रात देखील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरुन आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यात देखील दबावाचे राजकारण सुरू झालं आहे. मला तर राज्यसभेसाठी ईडीचा वापर करतील का?, अशी भीती वाटू लागली आहे. राज्यसभेसाठी त्यांनी कितीही घोडे उधळू द्या, जिंकणार तर आम्हीच, असे देखील राऊत यांनी म्हटलं ( Sanjay Raut Criticized Bjp On Rajyasabha Election ) आहे. पुण्यातील हडपसर येथील महम्मदवाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त संजय राऊत आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ( 31 मे ) सत्तेच्या खेळात आम्हीच ग्रँडमास्टर होतो. पण, खेळाडूची चाल समजून शकलो नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. राऊत म्हणाले की, बुद्धिबळाचे पट आहे, आणि देशी खेळात शिवसेना सारखा पटाईत पक्ष नाही. शरद पवार हे तर कुस्तीगिर संघटनेचे अध्यक्ष आहे. त्यामुळे सगळे खेळ आमच्याकडे आहे, फक्त संगीत खुर्ची नाही, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.
'भाजपाला जड जाणार...' - सरळ मार्शल लॉ लावा आणि हुकूमशाही जाहीर करा. देशातील परिस्थिती पाहता हे लोकशाहीला पूरक नाही. जे विरोधात उभे राहतील त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणेच्या धाडी टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्लीतील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ज्या प्रकारे अटक झाली, ते पाहता का अटक केली तर हिमाचल प्रदेशचे ते प्रभारी म्हणून जाणार होते. ते भाजपला जड जाणार म्हणून त्यांना अटक केली. यापेक्षा सरळ मार्शल लॉ लावा आणि हुकूमशाही जाहीर करा, असे आव्हान संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिले आहे.
'काँग्रेसने आपली प्रकृती सुधरावी' - भविष्यात या देशाचं नेतृत्व काँग्रेसने करावं, असं सांगणारे आम्ही. काँग्रेसला आम्ही दूर करत नाही. आम्हाला काँग्रेसची गरज आहे. काँग्रेसशिवाय या देशातील विरोधी पक्ष पुढे जाऊ शकत नाही. काँग्रेसने आपली प्रकृती सुधारावी हे सांगणारे आम्ही आहोत, असे देखाली राऊतांनी सांगितले आहे.
'राजकारणात चढउतार येत असतात' - संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत राऊतांना विचारले असता त्यांनी म्हटले की, राजकारणात चढउतार येत असतात ते पचवता आलं पाहिजे. राजेला प्रजा असते मी प्रथमच ऐकतो आहे की समर्थक पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थक नव्हते सगळे मावळे होते. पंतप्रधान यांना देश तर मुख्यमंत्री यांना राज्य असत, तस राज्याचं असत.
'बाहेरच्या उमेदवाराचा परिणाम' - इम्रान प्रतापढी यांना काँग्रसने महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. त्यावर राऊत यांनी सांगितले की, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. तरी देशातील राजकारण पाहता काँग्रेस पक्षाने राज्यसभेसाठी सावध पाऊल उचलले पाहिजे होते. बाहेरच्या उमेदवारांचा परिणाम स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांवर होईल.
'एकत्र लढलो तर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवू' - येत्या महापालिका निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून लढावं. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत आहे. आमचा प्रयत्न आहे की, आम्ही एकत्र लढलो तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवू. तशी चर्चा सुरू आहे. आम्ही आशावादी आहोत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यांना त्यांच्या सोयीनुसार भूमिका घ्यावी लागते. त्यांना किती यश मिळतेय ते बघू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा - नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ई़डीचे समन्स