पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराला अचानक भेट देत, कोरोना संदर्भात आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका कोविड संबंधित करत असलेल्या कामाबद्दल कौतुक करत काही सूचना देखील केल्या आहेत, अशी माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यामुळे वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 50 रेमडेसिवीर इंजेक्शन महानगरपालिकेला भेट दिल्या आहेत.
शरद पवारांची कोविड सेंटरला भेट यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 51 हजारावर पोहचली असून मृतांचा आकडा देखील हजाराच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. सर्वच परिस्थिती पाहता कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शहरात चांगले आहे. आत्तापर्यंत 35 हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगर नगर पालिकेतील वॉर रूम ला भेट दिली आणि शहरातील कोरोना स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पवारांना यासंदर्भात माहिती दिली. एका तासाच्या भेटी दरम्यान पवारांनी महानगरपालिकेच्या कामाचे कौतुक केले असून काही सूचना देखील केल्या आहेत.
हेही वाचा - मराठी शिकवणाऱ्या सरांना आमीर खानने अशी दिली श्रद्धांजली