पुणे - शहरातील कोरोना संसर्गाची वाढती स्थिती, तर दुसरीकडे गाजावाजा करत उभारलेली जम्बो कोविड सेंटरसारखी यंत्रणा फेल ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना चांगलेच फैलावर घेतल्याची चर्चा आहे. पुण्यातील ही ढासळती परिस्थिती सुधारण्यासाठी आता शरद पवार मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
पुण्यात कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोट्यवधी रुपये खर्चून जम्बो कोविड सेंटर सुरू केले. मात्र, या सेंटरचे गेल्या काही घटनांतून वाभाडे निघाले आहेत. या जम्बो सेंटरवरून शरद पवार यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. परिस्थिती बिघडत असल्याने त्यांनी पुण्यातील प्रशासनाची खरडपट्टी काढली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी सद्यपरिस्थितीवर पवार यांनी चर्चा केली. यानिमित्ताने पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाय आखण्यासाठी पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
कोरोनाचा शहरात फैलाव वाढत आहे. रुग्ण संख्या लाखाच्यावर गेली आहे. योग्य उपाययोजना नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे लाखो रुपये खर्चून सर्वसामान्यांसाठी उभारलेले जम्बो कोविड सेंटर कुचकामी ठरत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता शरद पवार मैदानात उतरले आहेत. शनिवारी ते पुण्याचे पालकमंत्री इतर पदाधिकारी, अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठकही घेणार आहेत.
दरम्यान, शरद पवार यांनी पुणे शहराला ६ व्हेंटिलेटर रुग्णवाहिका आणि ५० रेमडिसिव्हर इंजेक्शन कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी दिले आहेत.