पुणे - कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन आठवीत शिकणाऱ्या मुलीवर शेजारीच राहणाऱ्या तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी धनंजय भोलेनाथ मारपिले (वय 22) याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात राहतात. बुधवारी पीडितेचा मामा वारल्यामुळे तिकडे जाण्यासाठी पीडितेला आणण्यासाठी तिची आई शाळेत गेली होती. परंतु ती शाळेत आलीच नसल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली असता पीडित मुलगी आरोपीच्या घरात आढळली. तिच्याकडे विचारपूस केली असता आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. आरोपी पीडितेच्या घराजवळच राहत होता. आरोपीने भावाला आणि आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करायचा आणि घरात घेऊन जात बलात्कार करायचा. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कामेगावकर अधिक तपास करीत आहेत.