पुणे : राज्यात रक्ताचा तुटवडा पाहता नाम फाउंडेशनच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिरात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नाम फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातच नव्हे देशभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती नाम फाउंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे.
सरकारवर टीका करण्यापेक्षा आपण काय करतोय हे पहावं
राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. राजकारण्यांनी एकमेकांवर टीका न करता आपण काय करू शकतो, याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्यात सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण एखादं घर दत्तक घेऊन गोरगरीब कष्टकरीला कशाप्रकारे मदत करू शकतो. याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सर्वांनी केला पाहिजे. असं मत यावेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे.
सर्वांनी नियमांचं पालन करावे
राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना अजूनही काही लोकांकडून नियमांचं पालन होताना दिसत नाहीये. सर्वसामान्य नागरिकांनी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या नियमांचं पालन करावं. असं आवाहन देखील यावेळी नाना पाटेकर यांनी केलं.
हेही वाचा : हे तर महावसुली सरकार, देवेंद्र फडणवीसांची मंगळवेढ्यात टीका