पुणे- तब्बल 9 महिन्यानंतर पूणे शहरात आजपासून इयत्ता 9 वी ते 12 वी च्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कुलमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पुण्यात शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र केवळ 66 च शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक शाळेतील शिक्षकांच्या कोरोना चाचणीचे अहवाल आले नसल्याने अद्याप शाळा बंद आहेत.
9 महिन्यानंतर सुरू झाल्या शाळा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले होते. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा सुरू होत्या. पुण्यात आज तब्बल 9 महिन्यानंतर आज शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी दोनदा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. अखेर आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत.
आज फक्त 66 शाळा सुरू
तब्बल नऊ महिन्यानंतर शहरातील सर्वच शाळांमधील घंटा वाजेल अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेकडून शहरातील सर्व शाळांची तपासणी होऊ शकली नाही. तसेच अनेक शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल शिक्षण विभागाला सादर न झाल्याने, शहरातील अनेक शाळा अद्याप बंद आहेत. पहिल्या दिवशी महापालिकेच्या 44 आणि खासगी 22 अशा एकूण 66 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
शाळा सुरू झाल्याचा आनंद
आजपासून शाळा सुरू होत असल्याने खूप आंनद होत आहे. शाळा, मित्र, शिक्षक यांना खूप मिस करत होतो. ऑनलाईन शाळा सुरू होत्या मात्र काही कळत नव्हते. मात्र आज शाळा सुरू झाल्याने, मित्र आणि शिक्षकांना भेटता आल्याने आनंद होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे.
दररोज पाच मिनिटे कोरोनाबाबत जनजागृती
शाळा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. दरोरोज सॅनिटायझर, मास्क, आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येईल. शाळेत दररोज पाच मिनिटे कोरोनाबाबत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
23 हजार पालकांचे संमतीपत्र
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना संमतीपत्र सादर करणे अनिवार्य आहे. आतापर्यंत 23 हजार 220 पालकांनी अशाप्रकारचे संमतीपत्र शाळेत सादर केले आहे. तर 3 हजार 213 शिक्षकांनी व 842 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणीचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये 13 शिक्षक आणि 7 शिक्षकेत्तर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.