पुणे - राज्यात सोमवार दिनांक 23 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र, पुणे शहरात शाळा सुरू केल्या जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कोरोना बाधितांचा आकडा सध्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्यची माहिती पुणे महानगर पालिकेची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केला.
राज्य सरकारने 23 नोव्हेंबर पासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला होता. त्यानुसार पुणे महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबत 13 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी जाहीर केले आहे.
पालकांचाही अत्यल्प प्रतिसाद-
पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून करोनाच्या रुग्णांचा आकडा वाढतच आहे. तसेच शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र मागवण्यात आले होते, त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. फक्त 5 ते 10 टक्के पालकांनीच संमती पत्र दिल्याने पालकांचाही शाळा सुरू करण्याला प्रतिसाद नसल्याचे दिसून आले, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत एकूणच परिस्थितीचा विचार करून याबाबत आयुक्तांशी चर्चा करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.