पुणे - दिल्लीत सुरु असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाने आता तब्बल 9 महिन्यांचा टप्पा पार केला आहे. या आंदोलनात आजवर 500 पेक्षा जास्त शेतकरी शाहिद झालेले आहेत. नुकत्याच झालेल्या धुव्वादार पावसात छातीपर्यंतच्या पाण्यामध्येही हे आंदोलन शेतकऱ्यांनी सुरुच ठेवले. तरीही केंद्र सरकार त्याविषयी ठोस अशी चर्चा करायला तयार नाही. त्यामुळे आंदोलनाचे मध्यवर्ती नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने (27 सप्टेंबर)रोजी "भारत बंद" ची हाक दिली आहे. या भारत बंदला भाजप वगळता सर्वच पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला असून, मोर्च्याच्या या आधीच्या आवाहनाला जसा शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती, पुणेने प्रतिसाद दिला होता. तसाच या भारत बंदलाही पुण्यात यशस्वी करण्याचा निर्णय झालेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
'24 सप्टेंबरला जनता जागर तर 27 ला पुणे बंद'
या वेळचा बंदचा दिवस हा असंतोष दिवस म्हणून पाळण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या निर्णय व धोरणांमुळे पेट्रोल रू. प्रति लिटर 110 रुपये झाले आहे, स्वयंपाकाचा घरगुती गॅस तर रु.1000 च्या जवळ पोहोचला आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. बँका, विमानतळ, रेल्वे इतकेच काय संरक्षण सामग्री कारखानेही केंद्र सरकारने विकायला काढले आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देशालाच देशोधडीला लावणाऱ्या या धोरणांविषयी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता "जागर निदर्शने" केली जाणार आहेत. स्वातंत्र्य लढ्यात 'राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे', 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असे अग्रलेख लिहून लोकमान्य टिळकांनी जनतेमधील इंग्रज सरकारबद्दलच्या असंतोषाला वाचा फोडली. त्या भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या महात्मा फुले मंडईतील प्रतिमेला साक्षी ठेवून 27 सप्टेंबरला सकाळी 10.30वा. असंतोष प्रकट सभा आयोजित करण्यात आली आहे.
'पुणे बंद यशस्वी करणार'
देशात मोदी सरकार आल्यापासून काही घराण्यांनाच व्यवसाय जावा. शेतकऱ्यांना अन्याय सहन कराव लागते आहे.आज बेरोजगारी वाढत चालली आहे. याच्या विरुद्ध मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जागर आंदोलन आणि भारत बंद करण्यात येत आहे. या भारत बंदच्या निमित्ताने पुणे बंद हे आंदोलन करण्यात येणार आहे. ते बंद यशस्वी करण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे, की त्यांनी येणाऱ्या 27 सप्टेंबरला दुकाने बंद करून पुणे बंद यशस्वी करावे, असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे. दरम्यान, या बैठकीला समितीच्या घटक पक्ष संघटनांचे पदाधिकारी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, जनता दल (से.) चे शहराध्यक्ष विठ्ठल सातव, लोकायतचे निरज जैन, राज्य काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी नितीन जाधव व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.