पुणे - शरद पवार हे छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचे पाईक आहेत. त्यांनी ते दाखवून द्यावे, शाहू महाराजांच्या नावाने सुरू झालेल्या सारथी संस्थेला न्याय द्यावा असे सांगत या सरकारचा सारथी संस्था बंद करण्याचा मानस दिसतो असा आरोप खासदार संभाजी राजे यांनी केला आहे. सारथी संस्थेबाहेर सुरू आलेल्या तारदूतांच्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी संभाजी राजे यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
मी सारथी समोर बसून आंदोलन केले होते, त्यावेळी सारथी ची स्वायत्तता कायम राहणार असा शब्द मुख्यमंत्र्यानी दिला होता. मात्र, हा तारादूत प्रकल्प सरकारला कळला नाही की काय असा प्रश्न पडतो. हा प्रकल्प दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. याला स्वायत्तता कशी म्हणणार? असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला. मराठा समाजातील अभ्यासू कार्यकर्त्यांना सारथीच्या कामकाजात सहभागी करून घेतले पाहिजे. सारथी संस्था हे छत्रपती शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे, ती जगवणे, तिची स्वायत्तता टिकवणे ही महाविकास आघाडी सरकारची जबाबदारी आहे. मात्र, सरकारने छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केलाय असे संभाजीराजे म्हणाले.
सहा दिवस उलटूनही आंदोलनाची दखल नाही
सारथी संस्थेत नेमणूक करावी तारादूत प्रकल्पाची व्याप्ती वाढवावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या तारदूतांच्या मागण्यांसाठी आपण उद्धव ठाकरें, शरद पवारांना भेटणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या सारथी संस्थेतील तारादूत हे विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून पुण्यातल्या सारथी संस्थेच्या बाहेर आंदोलन करत आहेत. सहा दिवस उलटूनही त्यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली गेली नाही. तारादूत सेवकांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी दूपारी आंदोलन ठिकाणी भेट दिली.