पुणे (पिंपरी चिंचवड) : आषाढी वारी पालखी सोहळा गेली दोन वर्षे कोरोनामुळे झाला नाही. आता दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देहू आणि आळंदीतून तुकोबांची आणि माउलींच्या पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. उद्या 20 जून रोजी देहूतून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होईल. 21 जूनला आळंदीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. देहू आणि आळंदीत वारकरी येण्यास सुरुवात झाली असून, या दोन्ही तीर्थस्थळांवर वैष्णवांची मांदियाळी आली आहे.
राज्यभरातून दिंड्या देहू आणि आळंदीत दाखल : राज्यभरातून विविध दिंड्या देहूत आणि आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत. टाळ-मृदंगाच्या नादामुळे तीर्थस्थळांवर ब्रह्मनाद होऊ लागला आहे. दोन्ही ठिकाणी भक्तिमय वातावरण होऊ लागले आहे. धर्मशाळा वारकऱ्यांनी गजबजू लागल्या असून, प्रशासनानेदेखील जय्यत तयारी केली आहे. वारकऱ्यांच्या दर्शनासाठी दहा हजार भाविक क्षमतेची दर्शन बारी उभारण्यात येत आहे.
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटताचि ।।
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी ।
पाहिली शोधुनि अवघी तीर्थे ।।
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा :
1. 20 जून 2022 रोजी पहाटे 5 वाचता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात श्रीविठ्ठल-रुक्मिणी महापूजा. पहाटे 6 वाजता वैकुंठस्थान श्री संत तुकाराम महाराज पूजा. सकाळी 7 वाजता तापोनिधी नारायण महाराज यांचे समाधीची महापूजा, संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज वारकरी यांच्या हस्ते होईल.
2. सकाळी 10 ते 12 रामदास महाराज मोरे (देहूकर) याचे पालखी प्रस्थान सोहळा काल्याचे कीर्तन होईल. सकाळी 9 ते 11 इनामदार वाड्यात श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन. दुपारी 2 वाजून 30 मिनिटाला पालखी प्रस्थान सोहळा प्रमुखांच्या उपस्थित होईल. सायंकाळी 5 वाजता पालखी प्रदक्षिणा. सायंकाळी 6:30 वाजता इनामदार वाड्यात पालखी मुक्कामी असेल. तिथे मुख्य आरती केली जाईल. त्यानंतर तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होईल.
असा असेल आळंदीचा प्रस्थान सोहळा :
1. मंगळवार दि. २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान करेल. रात्री आळंदीतच आजोळघरी दर्शनबारी मंडपात मुक्कामी राहील. बुधवार दि. २२ रोजी सकाळी आळंदीतून मार्गस्थ होईल व सायंकाळी पुण्यात मुक्कामी राहील. दि. २३ रोजीदेखील पालखी पुण्यातच मुक्कामी राहील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तमाम वारकरी, फडकरी, दिंड्यांच्या उपस्थितीत पालखीचे पालखीचे प्रस्थान होईल.
माउलींच्या पालखीच्या मुक्कामाची ठिकाणे : 2. शुक्रवार दि. २४ व शनिवार दि. २५ रोजी सासवड येथे दोन दिवस मुक्कामी राहील. त्यानंतर रविवार दि. २६ रोजी जेजुरी, सोमवार दि. २७ रोजी वाल्हे, मंगळवार दि. २८ व बुधवार दि. २९ रोजी लोणंद येथे दोन दिवस मुक्कामी. त्यानंतर गुरुवार, दि. ३० रोजी तरडगाव, शुक्रवार दि. १ व शनिवार दि. २ जुलै रोजी फलटण येथे दोन दिवस मुक्काम. रविवार दि.३ रोजी बरड, सोमवार दि. ४ रोजी नातेपुते, मंगळवार दि. ५ रोजी माळशिरस, बुधवार दि. ६ रोजी वेळापूर, गुरुवार दि. ७ रोजी भंडीशेगाव, शुक्रवार दि. ८ रोजी वाखरी तर शनिवार दि. ९ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहचेल. रविवार दि. १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे
हेही वाचा : Minister Rajesh Tope : कोरोनाचे सावट असले तरी वारी होणारच; आरोग्यमंत्र्यांची माहिती