पुणे - धनगर समाजासमोर बिरोबाची खोटी शपथ घेणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करून स्वत:ची वैचारिक पातळी दाखवून दिल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. त्या राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या उद्धारासाठी खर्च केले, त्या पवार साहेबांवर टीका करून पडळकर यांनी बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या, अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरात बोलताना शरद पवार म्हणजे 'महाराष्ट्राला लागलेला कोरोना' अशी जहाल टीका केली आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. बारामतीच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत पडळकर सारखा विषाणू बाजूला ठेवला, याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असे सांगत 'पडळकरांचे जेवढे वय नाही; त्यापेक्षा जास्त कारकीर्द शरद पवारांची आहे', असे त्या म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीत जप्त झालेले डिपॉझिट आणि त्यातून आलेलं नैराश्य यामुळे पडळकर टीका करत असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. अशा परिस्थितीत त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांची आवश्यकता आहे, असा सल्ला रुपाली चाकणकर यांनी दिला.
शरद पवारांवर टीका करण्यापूर्वी पडळकर यांनी भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा. ते स्वतः बारामतीत येऊन शरद पवारांची स्तुती करतात, त्यांच्या कार्याचे कौतुक करतात. त्यांचा आदर्श घेता आला तर घ्या, असा सल्ला चाकणकर यांनी दिलाय. तसेच भाजपची असभ्य संस्कृती तुम्ही फार लवकर शिकलात, असा टोमणा त्यांनी लगावला.