पुणे - दहा पाऊल पुढे आणि चार पाऊल मागे, ही चीनची नीती आहे. पण जेव्हा ते चार पाऊल मागे जातात, तेव्हा ते सहा पाऊल पुढे आलेले असतात. 1962नंतर चीन सातत्याने हेच करीत आलेला आहे. हा स्थानिक मुद्दा आहे, छोटे प्रकरण आहे, व्यवस्थित होईल, अशी भाषा आपली लोक वापरतात. सुदैवाने भारतीय संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री या सर्वांना चीनची भूमिका समजली आहे. त्यांनी सैन्याला जे योग्य वाटेल ते करा, पण भारतीय जमिनीचे नुकसान होऊ देऊ नका, असे सांगितले आहे. याच कारणामुळे चीनला त्रास होतोय आणि पुढील काळातही तो होणारच आहे, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांनी व्यक्त केले.
आपण कितीही सहकार्याची भूमिका घेतली तरीही, चीन भारताविरोधातील कारवाई थांबवणार नाही. कारण भारतासोबतच शत्रुत्व चीनसाठी रामबाण उपाय आहे. भारतासारख्या मोठ्या देशावर युद्धाचा, आर्थिक, औद्योगिक, कूटनीतीचा दबाव आणून इतर देशांना तुम्ही लहान आहात, आमच्या म्हणण्यानुसार काम करा, आम्ही म्हणतो तसे वागा, नाही वागला तर, आम्ही तुमचे हाल भारतापेक्षाही वाईट करू, अशी अप्रत्यक्ष धमकी चीन इतर राष्ट्रांना देत आहे. त्याचे दुष्परिणाम भारतावरही होत आहेत. भारतातील लडाख परिसरात आज युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत-चीन दरम्यान गोळीबार झाला नाही, असे कितीही म्हटले तरी, भारतीय सैनिक मरत आहेत, जमीन त्यांच्या ताब्यात जात आहे. चीनने एकही गोळी न चालवता हे केले आहे. त्यामुळे चीनला मूर्ख म्हणायचे की, शहाणा हा निर्णय भारतीय लोकांना घ्यायचा आहे, असेही डी. बी. शेकटकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... १९६२ ची पुनरावृत्ती : भारत अन् इतर देशांवर हल्ला करण्यासाठी कोरोना महामारीचा चीनकडून गैरफायदा..
डोकलाम हा चीन आणि भूतानच्या मधला भाग आहे. त्या भागात भारतीय सैनिक असतात. चीनला हा भाग त्यांच्या ताब्यात पाहिजे. भारतीय सैनिक त्या भागात राहिले नसते तर, आज डोकलाम चीनच्या ताब्यात राहिला असता. त्यांची ही महत्वकांक्षा भारताने पूर्ण होऊ दिली नाही, हा राग चीनला आहे. लडाखच्या बाबतीतही चीनची हीच महत्वाकांक्षा आहे. आता संघर्ष सुरू असलेल्या भागातून पुढे येऊन काराकोरमवर ताबा मिळवायचा आणि यावर ताबा मिळवल्यानंतर चीन-पाकिस्तान इकॉनॉमी कॉरिडॉरचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणापर्यंत जातील. त्यानंतर तो संपूर्ण भूभाग चीनच्या ताब्यात जाईल. त्याचे दुष्परिणाम भारतावर, भारतीय संरक्षण यंत्रणेवर होतील, असा संभाव्य धोका निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांनी व्यक्त केला.
नेपाळच्या पंतप्रधानांचा रिमोट कंट्रोल चीनच्या हातात आहे. चीनच्या म्हणण्यानुसार ते काम करतात. ज्या रस्त्याबद्दल नेपाळने आक्षेप घेतला आहे, त्या रस्त्याचे काम मागील दहा वर्षांपासून सुरू आहे. याआधी त्यांनी कधी विरोध केला नाही आणि आताच का हा मुद्दा उकरून काढला. पार्लमेंटमध्ये प्रस्ताव आणणे, भारताचा रस्ता आपल्या हद्दीत दाखवणे याचे दुष्परिणाम काय होतील, याचा विचार नेपाळने कधी केलाय का? यापूर्वीही नेपाळने माओवाद्यांना समर्थन दिले होते. त्याच माओवाद्यांनी नंतर भारतातील माओवादी आणि नक्षलवाद्याना यांना समर्थन दिले होते. नेपाळची ही वृत्ती माओवादी विचारसरणीची आहे, असे डी. बी. शेकटकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... भारत विरुद्ध चीन: सीमेवर झालेल्या हिंसेबद्दल केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया...