पुणे - महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाच्या सुनिता वाडेकर यांची निवड करण्यात आली. महानगरपालिकेमध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे. भाजपचा आरपीआय मित्र पक्ष असून दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणूक एकत्र लढवली होती.
महापालिकेत सत्ता आल्यानंतर आरपीआयला सत्तेत वाटा देण्यासाठी उपमहापौर पद आरपीआयला देण्यात आले होते. आरपीआयचे सिद्धार्थ धेंडे हे उपमहापौर झाले होते. मात्र, धेंडे यांच्या नंतर हे पद पुन्हा भाजप कडे आले होते. या नंतर भाजपच्या सरस्वती शेंडगे या उपमहापौर झाल्या होत्या. सरस्वती शेंडगे याचा राजीनामा घेण्यात आला आणि पुन्हा हे पद आरपीआयकडे देण्यात आले आहे.
आरपीआयमध्ये उपमहापौर पद मिळवण्यावरून अंतर्गत रस्सीखेच होती. यामध्ये सुनीता वाडेकर यांना हा मान मिळाला तर आरपीआयच्या नगरसेविका फरजाना आयुब शेख यांना पक्षाने गटनेते पदाची जबाबदारी दिली आहे. आजची उपमहापौरपदाची निवडणूक ही केवळ औपचारिकता होती.
या निवडणुकीच्या वेळी खासदार गिरीश बापट उपस्थित होते. भाजपा ने दिलेला शब्द पाळला असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि आरपीआय यूती मोठ्या जोमाने काम करणार असे गिरीश बापट यावेळी म्हणाले.