पुणे - प्राण्यांवर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबवून प्राण्यांच्या हक्क-अधिकारांचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी प्राणी प्रेमींनी पुण्यात मोर्चा काढला होता. यावेळी प्राणी शोषण मुक्ती क्षेत्रात काम करणारे देश-परदेशातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्राणी हेदेखील आपल्या समाजाचा आणि कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांचे संरक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे. हे अधोरेखित करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान येथून सुरू झालेला हा मोर्चा डेक्कन, फर्ग्युसन रोड मार्गे पुन्हा संभाजी उद्यान येथे आला. यावेळी फिनलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आदी देशांतील प्राणी मित्र कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
प्राण्यांशी होणारा दुर्व्यवहार, त्यांच्याशी केले जाणारे कृर वर्तन आणि त्यांना मिळणारे असुरक्षित वातावरण या सगळ्या विरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चात पशू अधिकार आणि मुक्तता यासंदर्भात मागण्या मांडण्यात आल्या आहेत.