पुणे - राखी पौर्णिमेचा सण या वर्षी तीन ऑगस्ट रोजी येत आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो नेहमीसारखा साजरा होऊ शकेल की नाही, यावरच प्रश्नचिन्ह आहे. सहाजिकच बहिण-भाऊ तर नाराज आहेतच, पण या सणाच्या दिवसावर अवलंबून असणारे व्यवसायिक देखील अडचणीत आले आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे राखी तयार करण्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यात ज्या राख्या तयार आहेत, त्या वर्कशॉपमधून दुकानापर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. तेव्हा दुकाने बंद असल्यामुळे राखी बहिणीच्या हाती आणि त्यानंतर भावाच्या मनगटावर पोहचेल की नाही, हा प्रश्न सध्या उभा राहिला आहे.
राखी तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या महिलांना सलग दुसऱ्या वर्षीही संकटाला सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी म्हणजे जुलैच्या दरम्यान प्रचंड पाऊस झाला होता. त्यामुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात महापुराची स्थिती होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या ठिकाणातील बहुतेक रिटेल विक्रेते हे पुण्यातील होलसेल बाजारपेठांमधून राख्या खरेदी करतात. पण, पावसामुळे ते पुण्यात पोहोचू शकले नव्हते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा मोठा फटका या व्यवसायिकांना बसला आहे.
हेही वाचा - कारगिल विजय दिवस : भारतीय सैनिकांच्या शौर्याला क्रिकेटपटूंचा सलाम
परत लॉकडाऊन लागेल की काय? याची भीती आहेच....
साधारणतः राखी पौर्णिमेच्या 15 ते 20 दिवस अगोदर शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील विक्रेते, होलसेल व्यावसायिकांकडून राख्या विक्री करून घेऊन जात होते. पण, यंदा पुणे शहरात जो दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्याचा फटका या होलसेल व्यवसायिकांबरोबर छोटे-मोठे दुकानदारांनाही बसला आहे. राखी विक्रीला कमी दिवस मिळाल्याने आणि परत लॉकडाऊन लागेल की काय, या भीतीने दुकानदार राखी कमी खरेदी करत आहेत.
यंदाही आम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार...
यावर्षी राखीच्या किमतीत वाढ झाली नसली, तरीही आहे तो माल विक्री होत नसल्याने या विक्रेत्यांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पूर्ण तयारी करूनही हा व्यवसाय करता येत नाही. माल असाच ठेऊन देता येत नाही. कारण त्यांची फिनिशिंग खराब होते. वर्षभर इतर कोणत्याही कारणाने राखी वापरली जात नाही. म्हणून यंदाही आम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार, अशी माहिती होलसेल विक्रेते अमित डायमा यांनी दिली.
दरवर्षी आम्ही जास्त राख्या खरेदी करत होतो. कारण तेवढे दिवस विकायला मिळायचे. पण यंदा लॉकडाऊनमुळे आम्हाला जास्त राख्या खरेदी करता येत नाही. दिवस खूप कमी राहिले आहेत आणि दुकाने लावायची की नाही, हा प्रश्न पडला आहे. सोसायटी किंवा जवळच्या लोकांना ऑनलाईन विकता येईल, तेवढीच राखी यंदा खरेदी करत आहोत, अशी माहिती काही दुकानदारांनी दिली.
यंदा कोरोनामुळे संपूर्ण नुकसान होणार...
लॉकडाऊन हटवत असताना फक्त दहा दिवसच व्यवसायासाठी मिळाले आहेत. जो व्यवसाय पूर्ण महिनाभर केला जात होता, त्यासाठी फक्त दहा दिवस मिळाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. शिवाय पोस्ट, रेल्वे, बससेवा, कुरिअर बंद आहे. आमच्या दुकानांच्या परिसरात अनेक ठिकाणी पत्रे लावले आहे. त्यामुळे रस्ते बंद असतील तर व्यावसायिक ग्राहकांना चांगली सुविधा कशी देणार आम्ही तयार केलेल्या राख्या राज्यभर जात असतात. परंतु, यंदा कोरोनामुळे संपूर्ण नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न या व्यवसायिकांसमोर निर्माण झाला आहे.