पुणे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. स्थानिक पातळीवर चंद्रकांत पाटील यांना पोस्टरबाजी करून विरोध केला जात आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघात टक्कर देण्याच्या दृष्टीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. जर चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून उभे राहणार असतील तर त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी निवडणूक लढवावी, अशी विचारणा राजू शेट्टी यांनी विश्वंभर चौधरी यांना केली आहे.
हेही वाचा - कोथरूडकरांवर विश्वास, ते मला बाहेरचा बोलणार नाहीत - चंद्रकांत पाटील
कोथरूड विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच लोकांमधून निवडून जाण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील करत असताना या मतदारसंघात त्यांच्याविरोधात टक्कर देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता उभा करण्याचा राजू शेट्टी यांचा मनसूबा आहे. त्यामुळेच विश्वंभर चौधरी यांना चंद्रकांत पाटील यांना टक्कर देण्यासाठी रिंगणात उतरण्याची विनती राजू शेट्टी यांनी केली आहे.
हेही वाचा - ...म्हणूनच आदित्य ठाकरेंनी निवडला वरळी मतदारसंघ?
दरम्यान, राजू शेट्टी यांनी आपल्याला विचारणा केली आहे. मात्र, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आता राजकीय क्षेत्रात जाण्याबाबत फारशी तयारी नाही. तरीदेखील राजू शेट्टींच्या प्रस्तावावर विचार करून उत्तर देऊ, असे विश्वंभर चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीतच कोथरूड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी आहे. स्थानिक संघटनांकडूनही मेधा कुलकर्णी यांना पाठिंबा दर्शवला जात आहे.
दरम्यान, मेधा कुलकर्णी यांना भविष्यात विधानपरिषदेवर घेण्याची तयारी दाखवण्यात आल्याचे वृत्त असून विधानसभेच्या बदल्यात त्यांना विधानपरिषदेवर घेतले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी देखील चंद्रकांत पाटील जर आपल्या मतदारसंघात उभे राहत असतील तर त्यांना भरघोस मतांनी निवडून आणू, अशी हमी दिली आहे.
हेही वाचा - सातारा लोकसभेचा आखाडा रंगणार.. उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील
अद्याप कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा निवडणूक लढवण्यावर सध्या तरी चर्चाच आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यैांची ऑफर विश्वभर चौधरी स्वीकारणार का हे पाहणे महत्तवाचे आहे.