पुणे - देशात शेतकरी आंदोलनाने जोर धरला आहे. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. दिल्लीतील एकंदरीत परिस्थिती बघितली तर सरकारला हे आंदोलन चिरडून टाकायचे आहे का, अशीच शंका येत असल्याचे सांगत, असे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. केंद्र सरकारने केलेले शेतकरी कायदे हे केवळ अंबानी आणि अदानी यांच्या फायद्यासाठी केलेले आहेत आणि म्हणून शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून 22 डिसेंबरला मुंबईतल्या रिलायन्स भवनवर मोर्चा काढून अंबानींना जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.
विविध संघटना सहभागी
शेट्टी यांच्यासह विविध संघटनांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात होणाऱ्या या आंदोलनाची माहिती दिली. या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, शेतकरी कामगार पक्ष तसेच विविध कामगार संघटना शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला हमाल पंचायतीचे नेते बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, सुभाष वारे उपस्थित होते.
'शेतकरी संघटनांमध्ये फूट नाही'
दिल्लीमध्ये सुरू असलेले आंदोलन हे केवळ पंजाब आणि हरयाणा मधील शेतकऱ्यांचे आंदोलन आहे, असे भासवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र हे आंदोलन सर्व देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. अशा प्रकारचे व्यापक शेतकरी आंदोलन यापूर्वी कधीही झाले नाही, आता ही लढाई काही राज्यांची नाही, तर सर्व शेतकऱ्यांची आहे. हे कायदे शेतकरीविरोधी आहेत, असे शेट्टी यावेळी म्हणाले. सरकार काही शेतकरी संघटनांना पुढे करून शेतकरी संघटनांमध्ये फूट पडल्याचे सांगत आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. कुठल्यातरी फुटकळ संघटनांना समोर केले जाते. भाजपाच्या हक्काच्या संघटना या कायद्याला पाठिंबा द्यायला पुढे का येत नाही, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.
'94 टक्के शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही'
आमची मागणी हमीभावासाठी आहे. चार टक्के लोकांना हमीभाव मिळतो तर 94 टक्के शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, हमीभाव कायदा बंधनकारक केला पाहिजे, बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करावा अशी मागणी आहे. मात्र ती मान्य होताना दिसत नाही. एकंदरीतच हे सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपू पाहत आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील विविध संघटना एकत्र येऊन या आंदोलनाच्या पूरक मोर्चा तसेच वेगळे कार्यक्रम करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले आणि याचाच भाग म्हणून 20 डिसेंबरला या शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान वेगवेगळ्या कारणांनी झालेल्या तीस लोकांच्या मृत्यूनंतर त्यांना आता श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. राज्यातील गावागावात मेणबत्त्या पेटवून या लोकांना श्रद्धांजली वाहिली जाईल, असे राजू शेट्टी यांनी.