पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता संवाद शिबारासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले आहेत. तत्पुर्वी ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली.
डॉ. लागू यांच्या निधनावर शोक व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले, डॉ. लागूंचे अनेक चित्रपट स्मरणात राहतात, असा माणूस आता होणार नाही. हिंदी चित्रपट सृष्टीत खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व हरपले, या शब्दात राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले लागू हे कधी 'डॉक्टरांचे' 'मास्तर' झाले ते कळलेच नाही.
डॉ. श्रीराम लागू यांचे निधन मंगळवारी १७ डिसेंबरला रात्री ८ च्या सुमारास झाले होते. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली होती. त्यांचा मुलगा आनंद अमेरिकेतून अंत्यदर्शनासाठी परतणार असल्यामुळे अंत्यसंस्कार शुक्रवारी करण्याचा निर्णय लागूंच्या कुटुंबीयांनी घेतला होता.