पुणे - शिवतीर्थावर शिवसृष्टी उभारली तेव्हा उत्सुकता म्हणून रोज जायचो. तेव्हाच मी सर्वप्रथम त्यांना भवानी तलवार घेऊन आले असताना भेटलो. तेव्हापासून त्यांचा सहवास लाभला. महाराजांच्या भूमिकेत स्वतः बाबासाहेबांनी कार्य केले. बाबासाहेबांची इतिहास वर्तमानाशी जोडून सांगण्याची हातोटी भावणारी असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त पुण्यातील आंबेगाव परिसरात असलेल्या शिवसृष्टीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, भारतीय जनता पक्षाचे आमदार व माजी मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यानंतर राज ठाकरे बोलत होते.
हेही वाचा-जम्मू पोलिसांनी उधळला दहशतवाद्यांचा कट; राममंदिर आणि पाणिपत रिफायनरी होती निशाण्यावर
पोवाडा म्हटला नसला तरी ते शिवशाहीर
राज ठाकरे म्हणाले, बाबासाहेब हे इतिहास आणि वर्तमानाशी संबंध जोडणारा धागा आहेत. त्यांच्या वाणीतील शिवचरित्र सहज समजणारे आहे. शिवचरित्र इतिहास म्हणून नाही, तर जीवनशिक्षण आपण शिकले पाहिजे. इतिहास समजेल, रुचेल आणि आवडेल अशा पद्धतीने त्यांनी इतिहास सांगितला. व्याख्यानात आणि भाषणात इतिहास कधीच सोडला नाही. दंतकथांना वाव नाही. इतिहास सांगताना अलंकारिक व सोप्या भाषेचा वापर केल्याने त्याला लोकप्रियता मिळाली. शिवचरित्र अनेकांनी लिहिले पण बाबासाहेबांनी ते घराघरात व मनामनात पोहोचवले. महाराष्ट्रात देशात आणि जगभरातही त्यांचे शिवचरित्र गेले आहे. त्यांनी पोवाडा म्हटला नसला तरी ते शिवशाहीर आहेत. इतिहास संशोधक आहेत. इतिहास सहज समजावा यासाठी त्यांनी कार्य केले. यापुढेही हे कार्य पुढे चालू राहील, असेही राज ठाकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले.
हेही वाचा-जम्मू पोलिसांनी उधळला दहशतवाद्यांचा कट; राममंदिर आणि पाणिपत रिफायनरी होती निशाण्यावर
बाबासाहेबांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी – अॅड आशिष शेलार
आशिष शेलार म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनीच बाबासाहेबांना शिवकार्याची प्रेरणा दिली. अष्टावधानी अशी ही व्यक्ती आहे. ते सहनशील, दयावान आणि क्षमाशील आहेत. इतिहास लिखाणावर अनेकांनी वार केले; पण आपण संयम आणि क्षमाशीलतेने त्याचा सामना केला. अनेकांसाठी प्रेरणादायी असे बाबासाहेबांचे जीवन आहे. लिहून, बोलून शिवजागर केल्यानंतर आता शिवसृष्टी उभारून शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण सगळ्यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला हातभार लावयला हवा.
हेही वाचा-'फाळणीच्या भयंकर आठवणींचा दिवस' म्हणून पाळण्यात येणार 14 ऑगस्ट - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदींनीही शुक्रवारी बाबासाहेब पुरंदरेंचे केले कौतुक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यातून प्रेरित होऊन आजच्या तरुण पिढीने महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेला पाहिजे. बाबासाहेबांनी हे अद्भत असे काम करुन ठेवले असून त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. बाबासाहेबांनी महाराजांचे विचार समाजात पोहचवून सर्वाना जागृत केले, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.