पुणे - सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात पुण्यातील सौरव महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे याचे कनेक्शन असल्याचे पुढे आले होते. महाकालला पुणे पोलिसांनी मोक्कोच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने त्याची चौकशी केल्यानंतर पंजाब पोलिसांनीही सौरव महाकालची चौकशी केली आहे. यात अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंजाब पोलिसांचे अधिकारी पुण्यात - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. मुसेवाला प्रकरणात पंजाब पोलीस पुण्यातून माहिती घेवून पंजाबला रवाना झाले आहेत. सौरव महाकाल उर्फ सिद्धेश कांबळेच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर पंजाब पोलिसांचे अधिकारी पुण्यात आले होते. सौरव महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे हा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात आहे का? याचा पंजाब पोलिसांकडून तपास करण्यात आला आहे.
महाकालने केले अनेक धक्कादायक खुलासे - सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. त्यासंदर्भात दोन दिवसापूर्वी ग्रामीण पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या महाकालची चौकशी केली. या चौकशीत सौरव महाकालने अनेक धक्कादायक खुलासा केल्याची माहिती आता समोर आली आहे.
बॉलिवूडमधील बड्या कलाकारांकडून करणार होते खंडणी वसूल - महाकालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बिष्णोईचा सहकारी विक्रम बराडने तीन लोकांच्या माध्यमातून हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवले. सलमान खानला दिलेल्या धमकीनंतर बॉलिवूडमधील बड्या कलाकारांकडून खंडणी वसूल करता येईल, असे महाकालने पोलिसांनी केलेल्या चौकशीत कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.