पुणे - प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पुण्यातील अनिकेत अमरेंद्र साठे हा तरुण लष्कराच्या सेवेत लेफ्टनंट पदावर नियुक्त झाला आहे. तो यावर्षी डेहराडून येथील भारतीय लष्करी अकादमी मधून पासआऊट झाला आहे. त्याचा 12 डिसेंबरला भारतीय लष्करी अकादमीच्या प्रागणात दीक्षांत समारंभ पार पडला. त्याच्या या निवडीने पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याची ही निवड पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये दाखल होण्यापूर्वीच त्यांचे वडील अमरेंद्र साठे यांचे निधन झाले होते. तरीही ते खचून न जाता येणाऱ्या परिस्थितीवर मात करीत त्यांनी लेफ्टनंट पदापर्यंत वाटचाल करीत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अनिकेत साठे हे कोथरुडचे रहिवासी असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फार मोठी मजल मारली आहे. त्यांचे शिक्षण विखे पाटील मेमोरियल स्कूल येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले आहे.
एनडीएमध्ये तीन वर्ष प्रशिक्षण-
डिसेंबर 2016 मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी( NDA) च्या 137 व्या तुकडीसाठी अनिकेत साठे यांची निवड झाली होती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीतील तीन वर्षे आणि इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथील एक वर्षाचे प्रशिक्षण अतिशय यशस्वीरित्या पूर्ण करून आज त्यांनी लेफ्टनंट पद मिळवले आहे. त्याबद्दल पुण्यातील विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.