पुणे - विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर पुणेकरांनी विजयी जल्लोष केला. पुणेकरांनी तिरंगा फडकवत भगव्या पताका आणि फटाक्यांची आतषबाजी केली. संपूर्ण फर्ग्युसन रस्ता, डेक्कन मार्ग परिसरात पुणेकरांचा जल्लोष आणि उत्साह दिसून आला. मात्र, पुणेकरांची गर्दी पांगवतांना पोलिसांच्या 'नाकी नव' आले. त्यामुळे आनंदोत्सव साजरा करताना पुणेकरांना पोलिसांच्या लाठिचा 'प्रसाद'ही मिळाला.
पुण्यातील डेक्कन चौकातील उत्साही क्रिकेटप्रेमींना आवरण्यासाठी पोलीस दाखल झाले. मात्र, गर्दीला आवाहन करुनही उत्साही तरुणांनी ऐकले नाही. त्यामुळे डेक्कन चौकात दाखल झालेल्या पोलिसांनी गर्दी हटवताना काही उत्साही कार्यकर्त्यांना चोप दिला. त्याचबरोबर फर्ग्युसन मार्गावरही अनेक उत्साही क्रीडाप्रेमींना पोलिसांनी चोप देऊन गर्दी पांगवली. मध्यरात्री एक वाजून गेल्यानंतरही पोलीस गर्दी नियंत्रणाचा प्रयत्न करत होते.