पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी प्रथम सत्र परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. प्रथम सत्र परीक्षेच्या आधी सराव परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेला देखील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. जवळपास 65 टक्के विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली.
दरम्यान प्रथम सत्र परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील मिळून ५ लाख ८० हजार २२४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यातील ३ लाख ७४ हजार विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिलेली आहे.
परीक्षा झाल्यानंतर 48 तासांमध्ये लागणार निकाल
विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशनतर्फे यंदा पहिल्यांदाच ही परीक्षा घेतली जात असून, ही परीक्षा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. नियमित, बॅकलॉग, एटीकेटी अशा सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. ही परीक्षा एमसीक्यू स्वरुपाची आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअर ४८ तासांत त्यांच्या स्टुडंट प्रोफाइलला दिसणार आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ८० लोकांचा तांत्रिक गट कार्यरत असणार आहे. विद्यार्थ्यांचा स्कोअर जाहीर झाल्यानंतर ४८ तासांच्या आत विद्यार्थ्यांना आपली तक्रार स्टुडंट प्रोफाइलला नोंदवता येईल.
'परीक्षेची तयारी पूर्ण'
'एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन'च्या तांत्रिक विभागाचे प्रमुख गजानन अमलापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोज ऐंशी हजार ते दीड लाख विद्यार्थ्यांची परीक्षा होईल अशा पध्दतीने परीक्षेचे नियोजन केले असून, ही परीक्षा साधारण ४० ते ४५ दिवस चालणार आहे. एक विद्यार्थी किमान ५ ते ६ विषयांची परीक्षा देणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर
या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास त्यांच्यासाठी ०२०- ७१५३०२०२ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. याशिवाय विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये एक चॅट बॉक्स देखील ठेवण्यात आला आहे. त्यामाध्यमातून देखील विद्यार्थी आपल्या अडचणी सांगू शकतात. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही पासवर्ड आणि युजरनेम मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना अधिक वेळ
सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे २० मिनिट अधिक वेळ देण्यात येणार आहे. तसेच अंध विद्यार्थ्यांना सोबत मदतनीस घेता येईल. सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या आहेत. त्यांनंतरही काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रातील कारागृहामध्ये प्रमाणापेक्षा अधिक कैदी; 2978 कैद्यांना कोरोना, 7 जणांचा मृत्यू