पुणे - पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार शहर तहसील कार्यालयाच्या वतीने दाट लोकवस्तीच्या कंटेन्मेंट झोनमध्ये वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित 1 लाख पांढरे सुती कापडी मास्कचे मोफत वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली. हे मास्क धुवून पुन्हा वापरता येणार आहेत. किमान वर्षभर वापरता येतील, या दर्जाचे हे मास्क आहेत.
लॉकडाऊनच्या काळात तसेच त्यानंतरही मास्क वापरणे आवश्यक आहे. शहरात काही सामाजिक संस्थांमार्फत मास्कचे वाटप झाले आहे. मात्र, ते तकलादू स्वरुपाचे आहेत. डिस्पोजेबल मास्कची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याने ते आणखी धोकादायक आहेत.
या भागातून फिरत असताना अनेक नागरिक तोंडावर रूमाल बांधून फिरत असल्याने मास्क वाटपाचा निर्णय घेतल्याचे तहसीलदारांनी सांगितले. तसेच काही महिला साडीचा पदर तात्पुरता तोंडाला लावतात, ओढणी-स्कार्फ गुंडाळून रस्त्यावर फिरतात. त्यांचे हे वर्तन स्वत:च्या आणि इतरांच्याही आरोग्याशी खेळणारे आहे, असे त्या म्हणाल्या. योग्य संरक्षण न मिळाल्याने दाट लोकवस्तीच्या भागात कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढू शकतो. यावर खबरदारी घेत जास्त काळ टिकाणाऱ्या मास्कची गरज होती. यामुळे पुन्हा पुन्हा वापरता येतील असे मास्क वाटप करणे आवश्यक होते. येणाऱ्या काळात कोरोनाचा प्रसार वाढणार असून किमान वर्षभर मास्क वापरावे लागण्याची शक्यता आहे. अन्य मास्क जास्त काळ टिकत नसल्याने या प्रकारच्या सुती मास्कची गरज होती. आता हे वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित दोन लेअरचे कापडी मास्क शासनाच्या वतीने पुणे शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये वाटणार आहे.
मास्क वापरायला टाळाटाळ करू नका. डिस्पोजेबल मास्क वापरत असाल तर त्याची योग्य विल्हेवाट लावा. हलक्या दर्जाचे मास्क वापरणे तर अत्यंत धोकादायक आहे, असे आवाहन तहसीलदार तृप्ती कोलते यांनी केले आहे.