पुणे - शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात काही दिवसांपूर्वी दोन कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशाच कारणासाठी हे पोलीस मुख्यालय चर्चेत आले आहे. या पोलीस मुख्यालयाच्या आवारातच दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे.
ड्युटी ऑफिसरच्या मदतीस असलेल्या पोलीस शिपाई महिलेने थेट पोलीस नाईक महिलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित पोलीस नाईक महिला सोमवारी सकाळी पोलीस मुख्यालयात ड्युटी ऑफिसर असलेल्या मदतनीस महिला शिपायाकडे गेली होती. यावेळी दोघींमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि नंतर हे प्रकरण थेट हाणामारीवर गेले. ड्युटी ऑफिसरची मदतनीस असलेल्या महिला पोलीस शिपायाने नाईक पदावर कार्यरत असलेल्या महिलेवर हात उचलला. यावेळी मोठ्या प्रमाणात आरडा-ओरड, शिवीगाळ होत असल्यामुळे परिसरात कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. मारहाणीत पोलीस नाईक जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी मुख्यालयाचे प्रभारी प्रमुख असलेले पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, महिलांमध्ये झालेल्या मारहाणीची खात्यांतर्गत चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही.
हेही वाचा : नवे कृषिविधेयक सरकारने दहशतवाद्यांसाठी मंजूर केले का? सामनातून केंद्रावर उपहासात्मक टीका