पुणे - मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांना गणेशोत्सवापासून लांब राहण्याचे पोलिसांनी आदेश दिले आहेत. 13 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत झोन एकच्या हद्दीत राहण्यास आणि प्रवेश करण्यास त्यांना मनाई केली आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांच्याविरोधात हिंजवडी, खडक, बिबवेवाडी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा दाखला देत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या नावाने नोटीस जारी केली आहे.
हेही वाचा - राज ठाकरे 'ईडी'च्या चौकशीनंतर गप्प झालेत - अजित पवार
पोलिसांनी बजावलेल्या या नोटीसमध्ये असे बजावण्यात आले आहे की, 2014 पासून तुम्ही केलेल्या आक्षेपार्ह कृत्याबाबत तुमच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुमच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तवणुकीत सुधारणा झाली नाही. उलट तुम्ही नवनवीन पद्धतीने गुन्हे करत सार्वजनिक शांतता भंग करत आहात. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 13 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पुणे पोलिसांच्या झोन 1 च्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
हेही वाचा - कोल्हापूर-सांगली पूर प्रकरणी तत्काळ उपाययोजना कराव्यात - उच्च न्यायालयाचे आदेश
दरम्यान, रुपाली पाटील यांनी मात्र पोलिसांनी आपल्याविरोधात केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित होऊन केली असल्याचे म्हटले आहे. गणेशोत्सवात निर्माण झालेल्या डीजेच्या वादानंतर रुपाली पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन गणेशोत्सव साजरा करून दाखवावा, असे आवाहन दिले होते.