पुणे - वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे शहरात राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. परंतु असे असतानाही पुण्यात व्यापारी महासंघाने दुकाने बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी लक्ष्मी रस्त्यावर गुरुवारी आंदोलन केले होते. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई केली असून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांच्यासह ५० ते ६० व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
विश्रामबाग पोलिस ठाण्यात याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन व साथरोग अधिनियमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार गणेश तुर्के यांनी याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

आंदोलक व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यातील इतर दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेऊन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी गुरुवारी व्यापाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले होते. त्यामुळे शहरात लागू असलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
