पुणे- कोरोनाच्या काळात विवाह सोहळ्यासाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन करणे माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांना महागात पडले आहे. त्यांच्यासह तीन जणांवर पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याच्या हडपसर परिसरातील लक्ष्मी लॉन्समध्ये धनंजय महाडिक यांचा मुलाचा रविवारी विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी नियम डावलून हजार ते बाराशे लोकांची गर्दी जमविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भादंवि कलम 188, 269, 271 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व महाराष्ट्र covid-19 उपाययोजना 2020 चे कलम 11 अंतर्गत माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विवेक मगर आणि लक्ष्मी लॉन्सचे मॅनेजर निरुपल केदार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-कोरोना इफेक्ट : भारतीय रेल्वेला 36 हजार 993 कोटी तर मुंबई लोकलला 500 कोटींचा फटका
Covid-19 च्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या आदेशाचे पालन न करता हजार ते बाराशे लोकांची गर्दी जमवून सोशल डिस्टंसिंग चे पालन केले नाही. गर्दी जमवल्याने कोरोनाचा प्रसार होऊ शकतो याची जाणीव असूनहीगर्दी जमवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातमी वाचा- कोरोनाचे निर्बंध धाब्यावर..! पुण्यात भाजप नेत्याच्या शाही समारंभास सूट? तर पालघरमध्ये कारवाई
200 पेक्षा जास्त जणांची विवाहात उपस्थिती-
एकीकडे कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी लग्न सोहळे राजकीय कार्यक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. फक्त दोनशे लोकांनाच विवाह सोहळ्यासाठी परवानगी दिली जाईल असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, भाजपचे नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त पुण्यातील हडपसरमध्ये रविवारी आयोजित केलेल्या रिसेप्शनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे कसलेही पालन झाले नाही. या कार्यक्रमाला सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांसह 200 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहिल्याची माहिती आहे.
या राजकीय नेत्यांची होती उपस्थिती-
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अनेकांनी मास्क घातला नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसत होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता.