पुणे - आयपीएल सुरू होताच सट्टेबाजांनीही आपली दुकाने थाटली आहेत. पुणे पोलिसांनी रविवारी रात्री दोन ठिकाणी छापेमारी करत आयपीएल क्रिकेट सामान्यावर सट्टा खेळणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन मोठ्या क्रिकेट बुक्कींसह काही सट्टेबाजांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या बुकींकडून ९३ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. गणेश भुतडा व अशोक जैन अशी या बुकींची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ आणि मार्केटयार्ड पाेलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
93 लाख 16 हजार रुपयांची रोकड जप्त
आयपीएलमध्ये रविवारी दोन मोठे सामने होते. त्यामुळे यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार पेठेतील एका ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी गणेश भुतडा याला ताब्यात घेतले. तेथून ९२ लाख ६५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर मार्केट यार्ड येथून अशोक जैन या बुकीला ताब्यात घेण्यात आले. तेथून ५१ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत तपास सुरु होता.
दोन्ही बुकी देशातील मोठे बुकी
गणेश भूतडा आणि अशोक जैन हे दोघेही भारतातील मोठे क्रिकेट बुकी आहेत. रविवारी रााक्षी आयपीएलवर सट्टेबाजी सुरू असल्यच्या माहिती नुसार पोलिसांनी कारवाई करत त्यानुसार गणेश भुतडा आणि अशोक जैन यांच्या बुकीच्या अड्ड्यावर छापेमारी करत कारवाई केली. या कारवाईत त्यांच्याकडील डायऱ्या, मोबाईल आणि इतर काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यात या सट्ट्याच्या व्यवहाराची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मुंबई आणि बंगळुरू रॉयल चॅलेंजर्समध्ये होता सामना-
दरम्यान आयपीएलमध्ये रविवारी रॉरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हर्षल पटेलच्या हॅट्रिक व ग्लेन मैक्सवेलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी पराभव केला आहे. कर्णधार विराट कोहलीने 42 चेंडूत तीन षटकार व तीन चौकारासह 51 धावा तर ग्लेन मॅक्सवेलने केवळ 37 चेंडूत तीन षटकार व सहा चौकाराच्या मदतीने 56 धावा केल्या. कोहली व मॅक्सवेलच्या तुफानी फलंदाजीमुळे आरसीबी सहा गडी गमावून 165 काढत मुंबईसाठी 166 धावांचे आव्हान दिले होते.
आरसीबीच्या गोलंदाजांनीही शानदार प्रदर्शन केले. हर्षल पटेल या सामन्यात हॅट्रीक करत 'पर्पल कॅप'चा प्रबळ दावेदार ठरला आहे. त्याने या सामन्यात केवळ 17 धावा देत चौघांचा बळी घेतला. तसेच युजवेंद्र चहलने 11 धावा देत तिघांना तंबूत धाडले. मॅक्सवेलने उत्तम फलंदाजीनंतर चार षटकांत 23 धावा देत रोहित शर्मा व कृणाल पंड्या या दोघांचे विकेट घेत मुंबईला मोठा झटका दिला तर मोहम्मद सिराजने सूर्यकुमार यादवचा बळी घेतला. परिणामी मुंबई इंडियन्सचा संघ 18.1 षटकांत 111 धावांसह गारद झाला.
हेही वाचा - आयपीएल सामन्यांवर सट्टा, एका बुकीस अटक
हेही वाचा - आता मराठीतून ऐकायला येणार आयपीएलची कॉमेंट्री!