पुणे - आफ्रिकेतून आलेला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यामध्ये ओमायक्रॉन (Omicron Variant in Pune) हा नवीन व्हेरियंट आढळून आला. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन (PMC Alert) अलर्ट झाले आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास स्वतंत्र रुग्णालयाची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. तसेच वेळ पडल्यास आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR Test) वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
- जम्बो कोविड सेंटर रेडी पोझिशन -
ओमायक्रॉन व्हेरियंटचा थेट पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता महापालिका खडबडून जागी झाली आहे. जम्बो कोविड सेंटरसह पालिका रुग्णालयातील सर्व साहित्य आणि सद्यस्थितीचा आढावा घेऊन 'रेडी पोझिशन' मध्ये ठेवण्यासंबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- शहरात कोरोना टेस्ट वाढणार -
सध्या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणि क्षेत्रीय कार्यालयानुसार कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. सध्या कोरोना नियंत्रणात आल्यामुळे कोरोना टेस्ट सेंटर कमी करण्यात आले आहेत. मात्र, भविष्यात गरज पडल्यास बंद करण्यात आलेली टेस्ट सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोरोना टेस्टचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामासाठी घेण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
- विमानप्रवास करून येणाऱ्या प्रत्येकाची RT-PCR टेस्ट -
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्यापासून, पुण्यात विमानप्रवास करून येणाऱ्या प्रत्येकाची महापालिकेच्यावतीने RT-PCR टेस्ट केली जात होती. त्यातीलच फिनलँड येथून प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रोन व्हेरियंटची लागण असल्याचे समोर आले आहे. लागण झालेल्या व्यक्तीची प्रकृती चांगली आहे.
- रुग्ण सापडलेल्या इमारतीमधील सर्वांची RT-PCR -
कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लागण झालेल्या व्यक्तींची प्रकृती चांगली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्या व्यक्तीच्या इमारतीमधील सर्वांची RT-PCR टेस्ट करण्यात आलेली आहे. पुणेकर नागरिकांनी, कोणत्याही अफवांना बळी पडून घाबरून जाण्याची गरज नाही, असंही मोहोळ यांनी सांगितलं.