पुणे - शहरातील खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव करण्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत असून सध्या 5 हजारच्या जवळ रुग्ण हे रुग्णालयात दाखल असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
महापौरांनी घेतली लस
कोविड लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला पुण्यात सुरुवात झाली, लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लसीचा पहिला डोस घेतला त्यानंतर ते बोलत होते. पुणे शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील एकूण बेड्सची संख्या सध्या 7 हजार इतकी आहे, त्यामुळे रुग्णांना बेडची कमतरता पडणार नाही, असा दावा त्यांनी केला तसेच शहरासाठी बुधवारी एक लाख 45 हजार लस उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली.
'लॉकडाऊन नको'
सध्या कोरोनाचा संसर्ग ज्यास्त असला तरी त्याची तीव्रता कमी आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, असे सांगत उर्वरित 10 टक्के रुग्णांना आवश्यक असल्यास ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर बेडची कमतरता पडू नये, लसीकरण वेगाने व्हावे, ज्यास्तीत टेस्टिंग व्हावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत, असे महापौर म्हणाले. दरम्यान पुणे शहरात लॉकडाऊनची आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोनाबैठक आहे, यावेळी लॉकडाऊन संदर्भात काय निर्णय आहे, ते पालकमंत्री कळवतील. मात्र भाजपाचा लॉकडाऊनला विरोध असल्याचे ते म्हणाले.
'15 लाख नागरिक लसीकरणाला पात्र'
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. अशा परिस्थितीत ज्यास्तीत ज्यास्त नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. आत चौथ्या टप्प्यात शहरातील 15 लाख नागरिक लसीकरणाला पात्र आहेत. त्यामुळे या सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन महापौरांनी केले.