पुणे - पुण्यातील मार्केट यार्डमध्ये (Pune Market Yard) कोकणातील हापूस आंब्याच्या पाच पेट्या दाखल झाल्या आहेत. या पाच डझन आंब्याच्या एका पेटीला तब्बल 31 हजार रुपये (Mango Crate Sold Rs 31 thousand) याप्रमाणे पाच पेटयांना विक्रमी भाव मिळाला आहे. मार्केट यार्डातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मागील 50 वर्षातील सर्वात विक्रमी बोली असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याला मागणी -
मागील 2 वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फळांचा राजा आंबा हा म्हणावा तितका बाजारात आला नाही. त्यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात आणि जास्त दर घेऊन आंबा खरेदी करावा लागला. पण यंदा हंगामाच्या आधीच आंबा हा बाजारात दाखल झाला आहे. यंदा अपेक्षेप्रमाणे जास्तच आंब्याची आवक होणार आहे आणि यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याला मागणी आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
या ठिकाणाहून होते आवक -
पुण्यातील मार्केट यार्डामध्ये महारष्ट्रातील रत्नागिरी, देवगड, कुणकेश्वर, तर दक्षिण भारतातून मद्रास, बंगळुरू आदी भागातून सर्वाधिक आवक होताना दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक विक्री ही रत्नागिरीतील देवगड या आंब्यांची होते. मार्केटमध्ये आंब्याच्या सिझनला सर्वाधिक आर्थिक उलाढाल होते.