पुणे - गेल्या काही काळापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली पुणे शहरातील प्रार्थनास्थळे, तसेच धार्मिकस्थळे घटस्थापनेपासून म्हणजेच, उद्यापासून उघडली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात स्वच्छता, सॅनिटायझेशन, तसेच भाविकांना ये-जा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांना चिरडले गेल्यानंतरही पंतप्रधानांचे मौनच! मात्र, त्याचे मला आश्चर्य वाटत नाही -सुप्रिया सुळे
प्रसाद आणि फुल, हार स्वीकारली जाणार नाही
उद्यापासून मंदिर सुरू होत आहे, मात्र दर्शनासाठी दहा वर्षांखालील मुलांना, तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, भाविकांनी आणलेला प्रसाद आणि फुल, हार हे देखील स्वीकारले जाणार नाही. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. उद्या पहाटे पाच वाजताच सनई - चौघडे वाजवत मंदिर सुरू करण्यात येणार आहे. भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचा वापर करूनच बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. त्याचबरोबर विना मास्क असलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
या नागरिकांनी घरीच थांबावे
आदेशानुसार, 65 वर्षे वयावरील नागरिक, को - मॉरबिड लक्षणे असलेली व्यक्ती, गर्भवती महिला व दहा वर्षांखालील मुले यांनी घरीच थांबावे, धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारी व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या ठिकाणी भेट देणारे नागरिक व काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाची लागण होऊ नये, अथवा प्रसार होऊ नये, याकरिता दक्षता घ्यावी. धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये. या करिता दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी सहा फूट अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी.
हेही वाचा - पुणे तिथे विमानतळ 15 दिवस राहणार उणे! नागरिकांची सणासुदीला गैरसोय