पुणे - राज्यशासनाने महापालिकेच्या कमाल आणि किमान सदस्यांची संख्या निश्चित केली आहे. पुणे महापालिकेत नगरसेवकांच्या संख्येत 9 ने वाढ होऊन ती 173 झाली आहे. तीन सदस्यांचे 57, तर दोन सदस्यांचा एक असे एकूण 58 प्रभाग झाले आहेत.
नगरसेवकांच्या संख्या वाढीचे कायद्यात रूपांतर -
राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबई महापालिका वगळता उर्वरित महापालिकेच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य
सरकारचा हा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर 2 नोव्हेंबरच्या राजपत्रात या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नगरसेवकांच्या संख्या वाढीचे कायद्यात रूपांतर झाले. त्यानंतर नगरसेवक निवडणूक आयोगाने बुधवारी आदेश प्रभाग जारी केले आहेत.
एक लाख लोकसंख्येला एक नगरसेवक -
पुणे पालिकेच्या सद्य:स्थितीत नगरसेवकांची संख्या 164 आहे. आता 23 गावांचा पालिका हद्दीत समावेश झाला आहे. च्या जनगणनेनुसार एकूण पुण्याची 2011 लोकसंख्या 35 लाख 56 हजार 824 आहे. त्यामध्ये अनुसूचित जातींची संख्या (एससी) 4 लाख 80 हजार 17, तर अनुसूचित जमातींची संख्या (एसटी) 41 हजार 561 एवढी लोकसंख्या आहे. राज्य सरकारने दुरुस्ती करून आता 30 लाख लोकसंख्येला नगरसेवकांची संख्या 168 केली आहे. त्यापुढील 1 लाख लोकसंख्येला एक नगरसेवक असा निर्णय घेतला आहे, त्यानुसार पुण्यात नगरसेवकांची संख्या 173 झाली आहे.
कच्चा आराखडा 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश -
तीन सदस्यांचे 57, तर दोन सदस्यांचा एक असे एकूण 58 प्रभाग आहेत. पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार झाल्यानंतर प्रगणक गट, प्रभाग दर्शविणाऱ्या केएकएल फाईल, सर्व प्रभाग, त्यामध्ये समाविष्ट प्रगणक गट, लोकसंख्येचे विवरण पत्र निवडणूक आयोगाकडे गोपनीयरीत्या सादर करण्याचे आदेशही पालिकेला दिले आहेत.
तीन सदस्यीय प्रभाग -
महापालिका हद्दीतील एकूण लोकसंख्या आणि एकूण नगरसेवक संख्या या सूत्रानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार एक सदस्यीय प्रभाग 55 हजार 423 लोकसंख्येचा असणार आहे. त्यात प्रभागाच्या लोकसंख्येच्या 10 टक्के कमी किंवा 10 टक्के जास्त ठेवता येणार आहे. त्यानुसार प्रभाग हा कमीत कमी 50 हजार लोकसंख्येचा असणार आहे.