पुणे - भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्या बंडखोरीवर टीका केली. यामुळे पुणे भाजपच्या शहराध्यक्षा आणि आमदार माधुरी मिसाळ संतापल्या आहेत. त्यांनी काकडे यांच्या विधानाचा जाहीर निषेध केला. सध्या काही बाह्यशक्ती भाजपमध्ये दुही माजवण्यासाठी सक्रिय झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. काकडे हे भाजपचे सदस्य नसल्याने त्यांनी भाजपच्या अंतर्गंत बाबींवर बोलू नये, असेही त्यांनी काकडेंना सुनावले आहे.
हेही वाचा... अधिकृत घोषणा: 'उरी' नंतर 'बालाकोट एअरस्ट्राईक'वर येणार चित्रपट
पंकजा मुंडे यांच्या पराभवाला पक्ष जबाबदार नाही. मुंडे यांचे जातीपातीचे राजकारण जबाबदार आहे, अशी टीका भाजपचे सहयोगी खासदार यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता भाजपमध्ये नवा वाद उभा राहिला आहे. काकडेंच्या या विधानानंतर पुणे भाजपच्या शहराध्यक्षा आणि संजय काकडे आमनेसामने आले आहेत.
हेही वाचा... ठराविक नव्हे तर सर्वच राज्यांचा जीएसटी मोबदला थकित - निर्मला सीतारामन
संजय काकडे यांच्या विधानामागे बोलविता धनी कोणी वेगळा आहे का? असे त्यांना विचारले असता, त्यांनी तसे वाटत नाही. मात्र, प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी अशी विधाने करण्याचे काम काकडे करत असतात, असा टोला मिसाळ यांनी यावेळी लगावला आहे.