पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही दिवसांपासून शहरातील बाजार समित्या बंद होत्या. मात्र, आता कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार पुन्हा सुरू झाले असून भाजीपाला आणि फळांची आवक वाढली आहे. शनिवारी(२८ मार्च) बाजारात सुमारे ६०० गाड्यांची अवाक झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. मात्र खरेदीसाठी सामान्य नागरिकांनी नाही, तर फक्त ठोक विक्रेत्यांनी यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती शनिवारी साप्ताहिक सुट्टीमुळे बंद आहे. पण शहरानजीक असणारे मांजरी, मोशी, उत्तमनगर आणि खडकी उपबाजार आवार आज सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेतकरी माल उतरवत असून ठोक विक्रेत्यांकडून तो शहरातील किरकोळ विक्रेत्यांना वितरीत होणार आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासना तर्फे खबरदारीचे उपाय करण्यात आले आहे. बाजार समितीत 'सोशल डिस्टन्स' ठेवला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठोक व्यापारी माल घेऊन सर्व भागातील विक्रेत्यांना देतील. मात्र बाजार समितीत थेट नागरिकांनी गर्दी करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. घराजवळ सर्व माल उपलब्ध होणार असून यापुढे देखील बाजार समिती सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.