पुणे - गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शिवतीर्थावर जोरदार भाषण झाले. त्यावेळी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी त्यांनी दंड थोपटले आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवावेच लागतील, असे त्यांनी म्हटले ( Raj Thackeray Statement Masjid Loudpseaker ) होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. त्यातच आता पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला आहे. येथील एका शाखा अध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला ( Pune MNS Activist Resign ) आहे.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेचे शाखा अध्यक्ष माजिद शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे मुस्लिम समाज नाराज आहे. त्यामुळे शेख यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.
याबाबत बोलताना माजिद शेख म्हणाले की, 2009 पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मी काम करत आहे. पक्षाशी एकनिष्ठ असून, पक्ष वाढविण्यासाठी नेहमी काम करत आलो आहे. पण, नुकतेच शिवतीर्थावर जी काही भूमिका पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्यावर आम्ही नाराज असल्याने हा राजीनामा दिल्याचे शेख यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
शिवाजी पार्कवरती बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आम्हाला लाऊडस्पीकरचा त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. युरोपात जा. तिथे मशीदीवर लाऊडस्पीकर नाही. तुम्हाला प्रार्थना करायची तर घरात करा, असे युरोपातील शासन आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले होते.