पुणे - सध्याच्या तरुणाईला मोबाईलने वेड लावले असताना दिवसरात्र असंख्य तरुण मुले मोबाईल मध्ये व्यस्त असतात. त्यामध्ये भर पडली पबजी (PUBG) या गेमची. या गेममुळे तरुणाईला अक्षरश: वेड लावले आहे. असाच प्रकार आज चाकण औद्योगिक वसाहतीत पहायला मिळाला. पबजी गेममुळे मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या एका तरुणाने चाकण परिसरात चांगलाच गोंधळ घातला. या तरुणाला नागरिकांनी अखेर चाकण पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अजित शिवाजी पवार (वय 25, चाकण) असे या तरुणाचे नाव आहे.
शिक्षण व काम व्यवसाय करण्याच्या वयात सध्याची तरुणाई तासंतास मोबाईल मध्ये व्यक्त होत चालली आहे. त्यातुन मोबाईलमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या पबजी सारख्या गेम खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या गेममधील कृत्याप्रमाणे बाहेर जगातही या तरुणाईचा वावर होत आहे. त्यामुळे हे गेम आता या मुलांच्या थेट मेंदूवर परिणाम करायला लागले आहेत का, असा प्रश्न ही घटना पाहिल्यावर समोर येत आहे.
मागील काही दिवसांपासून पबजी या खेळावर भारतात बंदी आणली जावी अशी मागणी केली जात आहे. पण अद्याप तरी तशी बंदी आलेली नाही. एकीकडे पबजीवर बंदीची मागणी सुरु असताना दुसरीकडे तरुणाई मात्र या गेमपासून अजिबात दूर जाण्यास तयार नाही. एवढेच नव्हे तर अनेक जण या गेमच्या आहारी गेले आहेत. यामुळे भयंकर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पबजी गेमच्या अति आहारी गेल्यामुळे अनेक ठिकाणी महाविद्यालयीन तरुणांची मानसिक स्थिती ढासळली असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. दरम्यान अजित या तरुणाला चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्यावर पालकांच्या मदतीने मानसिक रोग तज्ञांकडे उपचारासाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.