पुणे - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ग्रामीण भागात देखील भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात तहसील कार्यालयासमोर भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून या सरकारच्या बेफिकिरीमुळे महिलांवर अत्याचार वाढले आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, हेक्टरी 25 हजार रुपये रक्कम, सरसकट कर्जमाफी द्यावी, राज्यातील महिलांवर वाढते अत्याचार यासह इतर मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन व निदर्शन केले गेले.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार वेगवेगळ्या निर्णयाबद्दल अपयशी ठरत असल्याचा आरोपही यावेळी भापज आंदोलकांनी केलाय.यावेळी वासुदेव काळे (भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस) , तानाजी दिवेकर , गणेश आखाडे , राजाभाऊ तांबे , वसंत साळुंखे , मनोज फडतरे यांसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.