पुणे - गुजरात ज्याप्रमाणे भारताचा भाग आहे अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र देखील भारताचाच भाग आहे. तौक्ते चक्रीवादळ आधी केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि नंतर गुजरातमध्ये गेले. या चक्रीवादळामुळे जसे गुजरातचे नुकसान झाले, तसेच इतर राज्यातही झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे गुजरातला मदत केली, त्याचप्रमाणे इतर राज्यांना देखील मदत करायला पाहिजे होती, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला महाराष्ट्रात येणार होते, त्यानंतर मुंबईतून ते गुजरातला जाणार होते. परंतु ऐनवेळी त्यांचा हा दौरा रद्द झाला आणि ते गुजरातला गेले. गुजरातमध्ये गेल्यानंतर त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि गुजरात सरकारचा प्रस्ताव नसतानाही एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. वास्तवात देशाच्या प्रमुखांना सर्वच राज्यातील माहिती मिळत असते. त्यामुळे इतर राज्यात जे नुकसान झालं त्याचा विचार करून, त्या राज्यांनाही मदत केली असती तर ते योग्य ठरले असते.
तिसऱ्या लाटेसोबत लढण्यास सरकार सक्षम
यावेळी अजित पवारांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, पुण्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून, घरी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुण्यात सर्व प्रकारचे बेड उपलब्ध आहेत. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, यासाठी देखील सरकारने तयारी केली आहे. तिसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी सरकार सक्षम असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
हेही वाचा - गेल्या २४ तासांमध्ये देशात २ लाख ५९ हजार कोरोना रुग्णांची नोंद; ४,२०९ जणांचा मृत्यू