पुणे - एखादा गुंड तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढतो, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. शहराच्या दृष्टीने अशा घटना होणे बरोबर नाही. यातून आपण तरुण पिढीसमोर चुकीचा आदर्श ठेवत असून तो घातक आहे. अशा घटना घडणे योग्य नाही. सामान्य लोकांना पोलिसांचा आधार वाटला पाहिजे. पोलिसांचा वचक सामान्य लोकांवर नाही तर गुन्हेगारांवर असायला हवा, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे पोलिसांना सर्वांसमक्ष खडे बोल सुनावले.
शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात अनुकंपा भरती पोलीस पाल्य नियुक्तीपत्र आणि मुद्देमाल पूर्ण पुनःप्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर आयुक्त अशोक मोराळे, नामदेव चव्हाण, डॉ. जालिंदर सुपेकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे, असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मांसाहेबांसमोर मी नतमस्तक होतो. छत्रपती शिवरायांची कीर्ती उत्तरोत्तर वाढत आहे. छत्रपती शिवराय आपल्या सर्वांचे आदराचे स्थान असून शिवरायांना त्रिवार वंदन करतो.
गुन्हेगारांवर वचक राहील असं काम करा
पोलीस विभागाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासह या विभागातील रिक्त पदभरतीसाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलीस विभागाला अधिक मजबूत करण्याचं काम शासन करत आहे. पोलिसांनी देखील सेवा बजावताना नियमांचे पालन करुन चोखपणे कर्तव्य पार पाडावे. गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीचं उदात्तीकरण होणार नाही, याची दक्षता घ्या. चोऱ्या होवू नयेत, यासाठी रात्रीची गस्त वाढवा. गुन्हेगारांवर वचक राहील असं काम करा. सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रशिक्षण द्या. कर्तव्य निभावताना एकही चुक घडू नये, याची खबरदारी घ्या. त्याचबरोबर आपल्या दागदागिन्यांची चोरी होवू नये यासाठी नागरिकांनी देखील सावधानता बाळगावी, वैयक्तिक माहिती समाजमाध्यमांद्वारे उघड करु नये, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा - सोनिया गांधी यांनी अमिताभ आणि अक्षयकुमारची माफी मागावी - हरयाणाचे गृहमंत्री
काही दिवसांपूर्वी पुणे शहरात चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावर बोलताना पवार म्हणाले, पोलिसांनी असं वागायला नको होतं. एखाद्याच्या चुकीच्या वागण्यामुळे संपुर्ण पोलीस दलाची प्रतिमा खराब होते..त्या पोलिसांवर कारवाई झाली ते ठीक आहे. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याप्रकरणात लक्ष घालून असे का घडले याचा शोध घेतला पाहीजे.
हेही वाचा - निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागेल, नियमांचे पालन करण्याचे अजित पवारांचे आवाहन
मध्यंतरी मुंबईत होतो. त्यावेळी काही पोलीस अधिकारी आले होते. ते 35 लाख रुपयांच्या गाड्यात आले होते. आता आपण मंत्री किंवा इतरांना गाड्या घेताना त्याची नियमावली असते. मग मी माहिती घेतली. तर कोण्या उद्योगपतीने कॅनन्व्हायसाठी या गाड्या दिल्या होत्या. त्यातल्या काही गाड्या अधिकारी वापरतात. आपण शासनाचे अधिकारी आहात. कुणी उद्योगपतीने गाड्या दिल्या म्हणून शासनाची ड्युटी करताना अशा गाड्या वापरणे हे विचार करण्याची बाब आहे. गृहमंत्री वेगळ्या गाडीत फिरतात आणि अधिकारी वेगळ्या गाडीत. पण ड्युटीवर असताना हे करणं चुकीचे आहे. खासगी आयुष्य कोणीही कसे जगावं. पण ड्युटीवर असताना त्याचा आदर आणि पालन झालेच पाहिजे.