पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जून ( मंगळवार ) रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार ( PM Modi To Visit Maharashtra ) आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्वीकारले असून, 14 जूनला देहूत येणार ( PM Narendra Modi Dehu Visit ) आहे.
'असा' असेल पुणे दौरा - पंतप्रधान मोदी दुपारी 1.45 च्या सुमारास देहू येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण करतील. त्यानंतर सायंकाळी 4:45 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं लोकार्पण करतील. संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.
मंदिराची पूर्णबांधणी - संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे संत आणि कवी होते. जे त्यांचे अभंग आणि अध्यात्मिक किर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजाभिमुख पूजनासाठी ओळखले जातात. ते देहू इथे रहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिला मंदिर बांधण्यात आलं, पण त्याची औपचारिक रचना देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. या मंदिराची 36 शिखरांसह दगडी पुनर्बांधणी करण्यात आली. संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
जल भूषण इमारत - जल भूषण इमारत हे 1885 सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. या इमारतीचे आयुर्मान संपल्याने ती पाडली होती. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ऑगस्ट 2019 मध्ये नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. जुन्या इमारतीची सर्व वैशिष्ट्ये नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत जतन करण्यात आली आहेत.
काय आहे क्रांतीकारक गॅलरी? - सन 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. 2019 साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले, अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय आहे. हे संग्रहालय वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, स्वातंत्रवीर विनायक सावरकर, भिकाजी कामा, व्ही. बी. गोगटे, 1946 मधील नौदल क्रांती आणि अन्य क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करते.
टपाल तिकीटाचे प्रकाशन - पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होतील. 1 जुलै, 1822 रोजी फरदुनजी मर्झबानजी यांच्या हस्ते मुंबई समाचारची एक साप्ताहिक म्हणून छपाई सुरु झाली. त्यानंतर 1832 साली ते दैनिक झाले. हे वृत्तपत्र गेली 200 वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाईल.
दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त - पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त देहू परिसरात छावणीचे स्वरुप आलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोदींच्या सुरक्षेसाठी 10 पोलीस उपायुक्त, 10 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षकांसह 2 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.
देहूत व्हीआयपींनाच प्रवेश - पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी 8 वाजल्यापासून जुना मुंबई महामार्गावरून देहूत व्हीआयपी व्यक्तींनाच प्रवेश असेल. इतर वाहनांना प्रवेश नाही. सभास्थळी जाण्यासाठी तीन रस्ते ठेवण्यात आले आहेत. तळवडे, म्हाळुंगे आणि इंदोरी बाजूने या मार्गावरूनच नागरिक येऊ शकतात. पण, देहू गावात प्रवेश करण्यास मनाई आहे. नागरिकांच्या वाहनांची बायपासला सोय करण्यात आली आहे. खंडेलवाल चौकापासून परंडवाल चौकापर्यंत येण्यासाठी 20 बस आहेत. तिथून चालत सभास्थळी यायचं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.
मोदींच्या दौऱ्याला भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध - देहूरोड, देहूगाव, तळवडे, मोशी, दिघी, बोपखेल, निगडी, चिखली, चऱ्होली, भोसरी, कासारवाडी, पिंपरी या गावातील संरक्षण क्षेत्रातील बाधित जमीन असून सातबारा उताऱ्यावर रेड झोन शिक्का मारण्यात आला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून रेड झोनप्रश्नी अनेक आंदोलन, मोर्चे काढण्यात आली. पण, अद्यापही त्यावरती तोडगा काढला नाही. त्यामुळे मोदी यांनी याबाबत तोडगा काढवा, असे म्हणत भाजपा युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध केला आहे.
पोस्टरवरुन वाद - पंतप्रधान मोदी येणार असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये काही ठिकाणी त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, त्यावरुन वाद रंगला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाने मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अवमान केला आहे. वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलापेक्षा कोणीही मोठा नसताना मोदींचा फोटो मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता.
हेही वाचा - PM Modi Dehu Visit : पंतप्रधानांच्या सभास्थळी जय्यत तयारी; 30 ते 40 हजार वारकरी राहणार उपस्थित